पुणे शहर वाहतूक विभाग
दिनांक : 02.01.2026
पुणे शहर वाहतूक शाखेची नववर्षाच्या सुरुवातीला मध्य पिऊन वाहन चालवणाऱ्या 208 जनावर वर कारवाई
पुणे शहर वाहतूक विभागामार्फत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम दिनांक 31.12.2025 रोजी रात्री 23.00 ते 01.01.2026 रोजी पहाटे 05.00 वाजेपर्यंत राबविण्यात आली.
नमूद कालावधीत पुणे शहरातील विविध भागांमध्ये एकूण 40 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारून तपासणी करण्यात आली. या विशेष कारवाईदरम्यान एकूण 2128 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 208 वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत एकूण 51 वाहने मोटार वाहन कायद्यानुसार जप्त करण्यात आली असून, विविध उल्लंघनांपोटी रुपये 70,400/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.याशिवाय नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर, दिनांक 24.12.2025 ते 31.12.2025 दरम्यान दररोज रात्री 23.00 ते 01.01.2026 रोजी पहाटे 05.00 वाजेपर्यंत, वाहतूक शाखा, पुणे शहर अंतर्गत असलेल्या 30 वाहतूक विभागांमार्फत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये कारवाई करण्यात आली. या कालावधीत 486 वाहनचालकांवर मद्यपान करून वाहन चालविल्याबाबत कारवाई करण्यात आली आहे.
तसेच सन 2025 मध्ये (01 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025) या कालावधीत पुणे शहर वाहतूक शाखेच्या अखत्यारितील 30 वाहतूक विभागांमार्फत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या एकूण 6765 वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये कारवाई करून खटले दाखल करण्यात आले असून, सदर खटले मा. न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.
पुणे शहर वाहतूक विभाग सर्व नागरिकांना आवाहन करतो की, मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा.
मा. श्री. हिंमत जाधव पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा पुणे शहर








